शिवस्तुती

कैलासराणा शिव चंद्रमौळी
फणींद्र माथा मुगुटी झळाळी!
कारुण्यसिंधू भवदु:खहारी!
तुजवीण शंभो मज कोण तारी||१||

रवींदुदावानला पूर्ण भाळी
स्वतेज नेत्री तिमिरौघ जाळी|
ब्रह्मांडधीशा मदनांतकारी|
तुजवीण शंभो मज कोण तारी ||२||

जटा विभूती उटि चंदनाची
कपालमाला प्रित गौतमीची
पंचानना विश्वनिवांतकारी
तुजवीण शंभो मज कोण तारी ||३||

वैराग्ययोगी शिव शूलपाणी
सदा समाधी निजबोध वाणी
उमानिवासा त्रिपुरांतकारी
तुजवीण शंभो मज कोण तारी ||४||

उदारमेरू पति शैलजेचा
श्रीविश्वनाथ म्हणती सुरांचा
दयानिधी तो गजचर्मधारी
तुजवीण शंभो मज कोण तारी ||५||

ब्रह्मादि बंदी अमरादिनाथ
भुजंगमाला धरि सोमकान्त
गंगा शिरी दोष महा विदारी
तुजवीण शंभो मज कोण तारी ||६||

कर्पूरगौरी गिरिजा विराजे
हाळाहळे कंठ निळाच साजे
दारिद्र्यदु:खे स्मरणे निवारी
तुजवीण शंभो मज कोण तारी ||७||

स्मशानक्रीडा करिता सुखावे
तो देवचुडामणि कोण आहे
उदासमूर्ति जटाभस्मधारी
तुजवीण शंभो मज कोण तारी ||८||

भूतादिनाथ अरि अंतकाचा
तो स्वामी माझा ध्वज शांभवाचा
राजा महेश बहुबाहुधारी
तुजवीण शंभो मज कोण तारी ||९||

नंदी हराचा हर नंदिकेश
श्रीविश्वनाथ म्हणती सुरेश
सदाशिव व्यापक तापहारी
तुजवीण शंभो मज कोण तारी ||१०||

भयानक भीम विक्राळ नग्न
लीलाविनोएद करि काम भग्न
तो रुद्र विश्वंभर दक्ष भारी
तुजवीण शंभो मज कोण तारी ||११||

इच्छा हराची जग हे विशाळ
पाळी रची तो हरि ब्रह्मगोळ
उमापती भैरव विघ्नहारी
तुजवीण शंभो मज कोण तारी ||१२||

भागिरथीतीर सदा पवित्र
जेथे असे तारक ब्रह्ममंत्र
विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी
तुजवीण शंभो मज कोण तारी ||१३||

प्रयाग वेणी सकळा हराच्या
पदारविंदी वहाती हरीच्या
मंदाकिनी मंगल मोक्षकारी
तुजवीण शंभो मज कोण तारी ||१४||

किर्ती हराची स्तुति बोलवेना
कैवल्यदाता मनुजा कळेना
एकाग्रनाथ विष अंगिकारी
तुजवीण शंभो मज कोण तारी ||१५||

सर्वांतरी व्यापक जो नियंता
तो प्राणलिंगाजवळी महंता
अंकी उमा ते गिरिरुपधारी
तुजवीण शंभो मज कोण तारी ||१६||

सदा तपस्वी असे कामधेनू
सदा सतेज शतकोटि भानू
गौरीपती जो सदा भस्मधारी
तुजवीण शंभो मज कोण तारी ||१७||

कर्पूरगौर स्मरल्या विसावा
चिंता हरी जो भजका सदैवा
अंती स्वहीतसुचना विचारी
तुजवीण शंभो मज कोण तारी ||१८||

विरामकाळी विकळे शरीर
उदास चित्ती न धरीच धीर
चिंतामणी चिंतनी चित्तहारी
तुजवीण शंभो मज कोण तारी ||१९||

सुखावसानी सकळे सुखाची
दु:खावसानी टळती जगाची
देहावसानी धरणी थरारी
तुजवीण शंभो मज कोण तारी ||२०||

अनुहतशब्द गगनी न माय
तिचे निनादे भव शून्य होय
कथा निजांगे करुणा कुमारी
तुजवीण शंभो मज कोण तारी ||२१||

शांतिस्वलीला वदनी विकासे
ब्रह्मांडगोळी असुनी न दीसे
भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी
तुजवीण शंभो मज कोण तारी ||२२||

पीतांबरे मंडित नाभि त्याची
शोभा जडीत वरि किंकिणींची
श्रीवेददत्त दुरितांतकारि
तुजवीण शंभो मज कोण तारी ||२३||

जीवाशिवाची जडली समाधी
विटला प्रपंची तुटली उपाधी
शुद्धस्वरे गर्जति वेद चारी
तुजवीण शंभो मज कोण तारी ||२४||

No comments:

Post a Comment