गरोदरपणी जेवणात काय काय असावे

गरोदरपणी थोडा अधिक आहार घेतला पाहिजे असे का म्हणतात ?

गरोदरपणी गर्भाचे पोषण हे आईच्या अन्नावरच होत असते. त्यामुळे आईने दीडपट आहार घेतला पाहिजे. पण जेवणाच्या वेळी गच्च पोट भरून जेवू नये. दोन घास कमीच खावेत. त्यामुळे पचनात अडचण येत नाही. थोडे थोडे करून ३-४ वेळा खावे.

गरोदरपणी जेवणात काय काय असावे ?


भाकरी किंवा पोळी तसेच मेथी, शेपू, करडई, अळू, शेवग्याची पाने, अगस्तीचा पाला, आंबटचुका, पानकोबी, राजगिऱ्याची भाजी, कोथिंबीर अशा प्रकारची कोणतीही पालेभाजी रोज दोन्ही वेळच्या जेवणात असलीच पाहिजे. कोणत्याही डाळीचे वरण किंवा आमटी जेवणात असावी. मटकी, मूग, हरभरा, चवळी, वाटाणा यापैकी कशालाही मोड आणून त्याची उसळ रोजच्या जेवणात असावी. गवार, दोडका, घोसावली, भोपळा अशा प्रकारच्या फळभाज्याही मधून मधून जेवणात असाव्यात. मुळा, गाजर, बीट, टोमाटो, काकडी वगैरे कच्चे खाणे अधिक चांगले. रोज निदान एक कप दूध सकाळी व संध्याकाळी प्यावे. पेरू, चिकू, केली, सफरचंद, पपई, संत्री, मोसंबी अशा प्रकारची फळे रोजच्या जेवणानंतर खावीत. जांभूळ, करवंद, बोरं, आवळा, कवठ ही स्वस्त फळेही आरोग्याच्या दृष्टीने चांगली असतात. मटण, मासे, अंडी, यापैकी काहीतरी मधूनमधून जेवणात असावे. सर्वसाधारणपणे वरील गोष्टी जेवणात असतील असे पहावे म्हणून असा आहार समतोल आहार होईल.

मटण, मासे, अंडी असा आहार गरोदरपणात घ्यायला सांगतात. मग शाकाहारी लोकांनी काय करावे ?


शाकाहारी लोकांनी जेवणात कोणत्याही डाळीचे घट्ट वरण आणि मोड आलेली मटकी, दूध, हरभरे, भुईमुगाचे दाने, मूग, वाटाणे, सोयाबीन अशी कडधान्ये खाल्यास आवश्यक ती प्रथिने मिळतात. मग मटण, मासे, अंडी घ्यावयाची गरज नाही.

जेवणाच्या वेळी आणखी काय काळजी घ्यावी ?


गरोदर स्त्रीने शक्यतो ताजे अन्न खावे. ३-४ वेळा थोडे थोडे करून जेवावे. एकावेळी पोटभर जेवू नये. ४ घास कमी खावेत. म्हणजे अन्न नीट पचते. जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. दिवसभरात साधारणपणे ४-५  तांबे पाणी प्यावे. बद्धकोष्टता होणार नाही याची काळजी घ्यावी.

स्त्रोत : गरोदरपण, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

1 comment:

  1. Nice Blog…
    Thanks for sharing with us.
    f you want the best kind of medical treatment for your infertility problem at an affordable price then you can come to our IUI centre - Gomti Thapar Hospital in Moga.

    ReplyDelete