या आजाराचं नेमकं कारण

सिंड्रोम आणि रोग या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सिंड्रोम म्हणजे वेगवेगळ्या लक्षणांचा एक आजार समुह. या पीसीओएस मध्ये इतकी विविध लक्षणे आढळतात की २००३ पासून तज्ज्ञांनी खालीलपैकी २ लक्षणे आढळल्यास अशा आजारास पीसीओएस म्हणावे असे मान्य केले आहे.( European Society for Human Reproduction and Embryology (ESHRE) and the American Society for Reproductive Medicine (ASRM) )
१. अल्पबीजमुक्ती/अबीजमुक्ती (Oligo-ovulation or anovulation)- दोन पाळ्यांमधील काळ वाढणे किंवा अजिबात पाळी न येणे(oligomenorrhea or amenorrhea)
२.पुरूषी आंतर्स्त्राव वाढणे(Hyperandrogenism )- वर उल्लेखिल्याप्रमाणे पुरूषी बाह्यशरीरलक्षणे वाढणे किंवा पुरूषी स्त्रावांचे रक्तातील प्रमाण वाढणे.
३. सोनोग्राफीमध्ये बीजांडात द्रवपदार्थ भरलेले असंख्य कोष (सिस्ट) दिसणे-Polycystic ovaries
थोडक्यात पीसीओएस असण्यासाठी दरवेळेस सोनोग्राफीमध्ये असंख्य सीस्ट दिसतीलच असे नाही.
पीसीओएसची कारणे-
पीसीओएस या आजाराचं नेमकं कारण आजतागायत कळलेलं नाही. हा आजार वंशपरंपरागत असू शकतो पण असेलच असेही नाही. सध्या या आजाराच्या वाढत्या प्रमाणाचे एक मुख्य कारण आहार आणि जीवनशैलीतील बदल असावे हे सुचवले जाते.
मानवी शरीरात स्त्री आणि पुरूष या दोन्ही प्रकारचे आंतर्स्त्राव दोघांतही कमी अधिक प्रमाणात असतात. पण काही ठराविक गुणसूत्रांमुळे कोणते स्त्राव स्त्रीयांत आणि कोणते स्त्राव पुरूषांत जास्त प्रमाणात असावे हे ठरते.
तसेच शरीराच्या इतर पेशीत असणारे रीसेप्टर (जे 'वरून-मुख्य न्यूरोहार्मोनल सिस्टीमकडून' आलेल्या संदेशांचे ग्रहण करून त्याबरहुकूम कार्यवाही घडवून आणतात त्यांचे पेशीतील प्रमाण आणि संवेदनशीलताही स्त्री पुरुष शरीरात वेगवेगळी असते. ओव्हरी,टेस्टीज या खेरीज किडन्यांच्यावर असणारी छोटीशी सुप्रारिनल किंवा अ‍ॅड्रिनल ग्रंथीही पुरूषी प्रकाराची काही संप्रेरके बनवते.
सामान्यतः निसर्गाचे या सगळ्यांच्या समन्वयाचे एक चक्र असते पण काही जनुकीय घटकांमुळे किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे हे चक्र बदलले की त्याचे परिणाम असे पीसीओएसच्या स्वरूपात दिसून येतात.
(संप्रेरकांचे दळणवळण आणि कार्य हा फारच कीचकट आणि मनोरंजक विषय असला तरी एवढं तपशीलात जाणं इथे मला शक्य नाही. कुणाला अधिक कुतूहल असेल तर नेटवरून अधिक माहिती मिळवून वाचता येईल.)

No comments:

Post a Comment