मोबाईल शिवाय तुमचं बाळ मोठं होऊ शकतं !! हो हे अगदीच शक्य आहे



काळ वेगाने बदलत आहे आणि ४०-४५ वर्षाच्या लोकांपेक्षा अधिक स्मार्ट पद्धतीने ३-४ वर्षांची मुले मोबाईल हाताळतांना दिसतात . त्याला प्ले स्टोअर मधून आवडीच्या गेमचं अँप पण डाउनलोड करता येतं असं पालक अभिमानाने सांगतात . तो पटापट इंग्लिश मधील ऱ्हाइम गातो अगदी कोकोमेलन किंवा चुचु टीव्ही च्या कॅची जिंगल टोंन सकट . छान छान चाललंय सगळं . बाबा टीसीएस आणि आई इन्फोसिस मध्ये . घरी आल्या आल्या आई स्वयंपाक घरात काम करतेय तिनेही कोपऱ्यात मोबाईल ठेवलाय मधुराने नवी रेसिपी टाकलीय आनंदाने बनवते आहे . मस्स्स्त झाली आहे अगदी!!! बाबा ऑफिस चं काम घरी घेऊन आलाय , आजी आजोबा मस्त सिरीयल बघताय माझ्या नवऱ्याची बायको . आणि या सगळ्या साम्राज्याचे एकुलते एक नवाब बाबांचा मोबाईल घेऊन युट्यूब लावून जमिनीवर ओणवे पडून अगदी गोजिरवाणा ससा दिसतोय हो.
सगळ्या घरात एक चित्रमय शांतता . आजच्या तंत्र युगातील घरोघरचे हे प्रातिनिधिक चित्र. सुखावह !!!
किराणा दुकानात जाण्याची गरज नाही , आम्ही ऑनलाईन मागवतो . खेळणी ऑनलाईन ,
पुस्तक किंडल वर वाचतो . अभ्यास युडेमी !! युट्युब !! बायजु !! ईडीएक्स !!!
आम्ही डेट सुद्ध टिंडर वर करतो अजून काय पाहिजे !!
नशीब पोटात लागलेली भूक , नैसर्गिक विधी आणि संभोग या गोष्टींना ऑनलाईन पर्याय नाहीत .
त्यात खातांना हातात मोबाईल , आणि कमोड वर बसून सुद्धा मोबाईल वर ऑनलाईन असणारी महाभाग आहेत , वर त्यांचं कॉम्प्लिमेंट आहे की शांततेत मोबाईल कमोडवर असलो की मगच बघता येतो .
आणि पॅराडॉक्स म्हणजे हा लेख वाचणारी ८५% जनता मोबाईल वर वाचत आहे .
गालातल्या गालात हसत आहे आणि फॉरवर्ड वर क्लिक करून आज मस्त लेख वाचायला मिळाला ,
तुम्ही पण वाचा म्हणून पुढच्या ग्रुपवर पाठवतील . मला तुमचे फॉरवर्ड नकोय . तुमची आणि माझी अंतर्मुखता हवीय .हे सगळं कुठं घेऊन जाणार आहे आपल्याला ? पर्यायाने आपल्या लेकरांना !!!
मोबाईल शिवाय जगता येतं , खरंच !! विश्वास ठेवा . मोबाईल शिवाय मुलांना शिकवता येतं ,
माझा यावर विश्वास आहे . तो ऐकतच नाही मोबाईल द्यावाच लागतो नाहीतर खूप रडतो , माझा विश्वास नाही . त्याला रडू द्या . त्यातही आनंद आहे . मुलाला शांत केल्यानंतर जे समाधान भेटतं तेवढं नक्कीच माझ्या फोटोला किती लोकांनी लाईक केलं हे बघण्यापेक्षा जास्त आहे .

काही जगमान्य उपाय सांगतो जे मी काही दिवसापूर्वी अंमलात आणले ज्यांनी मोबाईल पासून दूर जात येतं

१) मोबाईल मध्ये ठराविक तेवढेच अप्लिकेशन ठेवा . फोटो रिलेटेड सगळे उडवून लावा
२) सगळ्या सोशल मीडिया अँप्लिकेशन चे नोटिफिकेशन बंद करा .
३) गजराचं घड्याळ घ्या , मोबाईलच्या अलार्मची सवय मोडा . पंधरा हजारांचा मोबाईल काय अलार्म लावायला घेतलाय का ?
4) झोपतांना मोबाईल दूर ठेवा आणि उपडा करून ठेवा
5) मेसेजचे नोटिफिकेशन बंद करा आणि घरच्यांना महत्वाचं असेल तर कॉल करण्याची शिकवण द्या
6) स्क्रीन लॉक पॅटर्न काढून टाका आणि त्याजागी कमीत कमी ८ अंकांचा कोड टाका .
7) दिवसभरात ३ वेळा मेल चेक करा . तुम्ही महामहिम राष्ट्रपती नाही ज्यांना दिवसभरात ५०-६० मेल येतील
8) आठवड्यातून एक दिवस मोबाईल घरी विसरत चला
9) लहान मुल कुठल्या प्रकारचे व्हिडीओ बघतंय त्यानुसार घरात त्याला प्रत्यक्ष गोष्टी द्या

उदारणार्थ माझ्या मुलाला प्राणी आवडतात मी खोटे ५०-६० प्राणी एकाच वेळेस आणून दिले ,
त्याला मोबाईल दिला तरी घेत नाही अशी अवस्था आली , काही दिवसांनी आता परत मोबाईल मागायला लागला , त्याला जेंगा चा बॉक्स आणून दिला , कधी क्ले कधी स्लाईम त्याचा मोबाईल वरचा फोकस नेहमी हालता ठेवला . मुले मोबाईल मागणारच , त्याला पर्याय एकच , त्यापेक्षा जास्त आवडीचे त्यांना दिले की बरोबर गुंतून बसतात .

फक्त कटाक्षाने गेमिंग पासून दूर ठेवा . त्याला सध्या तरी पर्याय नाही


10 ) ३-४ वर्षांच्या मुलाला एक तासाहून अधिक स्क्रीन टाइम नसावा ,

म्हणजेच टीव्ही मोबाईल लॅपटॉप सगळं मिळून दिवसात १ तास पेक्षा जास्त नको




ता क : तुम्ही म्हणाल लहान मुलांना मोबाईल पासून दूर कसे ठेवू हे सांगा , आम्ही आमचं बघून घेऊ , तर ताई आणि दादा तुमचं पोर आणि पोरगी अगदी तुमच्यावर गेलंय हो , तुम्ही जसं वागता तसं कार्ट वागतंय तेव्हा तुम्ही सुधारला की पोरगं सुधारलं म्हणून समजा


प्रा. महेंद्र प्रभाकर शिंदे 
अध्यक्ष , 
iSEARCH - INDIA