चाळिशीनंतरचा आहार

चाळिशीनंतर महिलांना उच्च रक्तदाब होण्याची शक्यता असते. या वयात त्यांच्या चयापचय क्रियेचा वेगही मंदावतो. पण विविध धान्यांच्या सेवनानं या दोन्हींचा सामना करणं शक्य होतं. खरं तर तिशीनंतरच टप्प्याटप्यानं चयापचय क्रिया मंदवण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे पांढरा ब्रेड किंवा पांढरा भात याऐवजी महिलांनी ब्राउन राईस, व्हिट ब्रेड किंवा ओट्स खायला पाहिजे. यामुळे शरीराला फायबर मिळेल. फायबरमुळे वजन वाढण्याला प्रतिबंध होतो आणि वजन कमी व्हायलाही मदत होते.
आहारात फळं आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करायला हवा. सॅलेड, कोशिंबिरी हासुद्धा फायबरचा एक चांगला स्त्रोत आहे. पालक, गाजर, काकडी, टॉमेटो, संत्री, स्ट्रॉबेरी अशा पदार्थांचं सेवनही महत्त्वाचं ठरतं.
फायबरबरोबर पोटॅशियम, क जीवनसत्त्व आणि अँटीऑक्सिडंट्स या पदार्थातून विपुल प्रमाणात मिळतात. यामुळे त्वचा चांगली राहते व सूर्याच्या अतिनील किरणांपासून बचाव होतो.
आहारातलं मीठाचं प्रमाण कमी करायला हवं. मीठामुळे शरीरात पाणी साचून राहतं आणि उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते. त्याबरोबर किडनी, धमन्या, हृदय, मेंदू यांनाही धोका पोहचू शकतो.
चाळिशीनंतर मधुमेहाचा धोका वाढतो. शक्यतो साखर आणि गोड पदार्थ टाळावेत. साखर जास्त प्रमाणात खाल्यानं वयस्कर दिसू लागता.

No comments:

Post a Comment