बहुगुणी शेवगा



आयुर्वेदिक दृष्ट्या शेवग्याची पाने ही औषधी असून यामध्ये अ, ब, क ही जीवनसत्त्वे, लोह कॅल्शियम सारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. आयुर्वेदात शेवग्याच्या पानांची पावडर करून त्याचा उपयोग कुपोषण रोखण्याकरिता पोषक आहारात केला जातो.

तोंड आल्यास शेवग्याची पाने चावून-चावून खावीत. तसेच शेवग्याची मुळे जंतनाशक असतात. शेवग्याच्या पानांच्या पावडरीचा उपयोग खरुज, उलटी होणे इ.वर होतो. तसेच जखमेवर पानांचा लगदा बांधल्यास आराम पडतो. कोवळ्या पानांच्या रसात मिरे घालून लेप लावल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो. पानंाच्या रसाने केसांतील कोंडा नाहीसा होतो.

शेवग्याचा पाला काहीसा तुरट असतो परंतु भाजी केल्यास उत्तम लागते. बरेच दिवसांच्या तापातून उठल्यास भ्ाूक पूर्ववत व्हावी म्हणून भाजी खावी तसेच शेवग्याच्या पानाचे पोषणमूल्य अनन्यसाधारण आहे. त्यामध्ये दुधापेक्षा चौपट पटीने अधिक कॅल्शियम आढळते. सहा ते सात संत्र्यांमध्ये जितके जीवनसत्त्व ‘क’ आढळते तितकेच या पानांमध्ये आढळते. शेवग्याच्या पानातील प्रथिने पाचक असतात. ३ केळ्यांपासून जितके पोटॅशिअम आपल्याला मिळेल तितकेच १ बाऊल भाजीत आपल्याला आढळते.

शेवग्याच्या शेंगा

शेवग्याच्या पानाइतकेच शेवग्याच्या शेंगानासुद्धा महत्त्व आहे. शेवग्याच्या शेंगेला वेगवेगळी नावे आहेत. जसे मोरंगा;म्हणजे आपला मुंगणा, इंग्लिशमध्ये ड्रमस्टिक. आपल्याकडे काही भगात शेवगा देखील म्हणतात. याचेच बॉटनिकल नाव मोलिंगा ओलेयेरा असे आहे. मुंगण्याच्या किंवा शेवग्याच्या शेंगेत व त्याच्या बियांमध्ये व्हिटॅमीन ए, बी, बी २, बी ३, आणि सी, फोलिक ऍसिड, ऍस्कॉर्बिक ऍसीड; बीटाकॅरेटीन इत्यादी शरीर स्वास्थ्याचे घटक असल्यामुळे ‘बहुमूल्य’ आहेत.

याची खासीयत अशी आहे की भारताच्या कुठल्याही भौगोलिक ठिकाणी हे उपयोगी गुणी झाड सहजच उगवते. कुपोषणासारख्या राक्षसावर मात करण्यास हे बहुगुणी झाड ग्रामीण भागातील लोकांना आधारभ्ाूत आहे.

अफ्रिकेसारख्या देशात भ्बळीविरुद्ध लढा देण्याकरिता उत्कृष्ट आहार म्हणून शेवग्याच्या शेंगा, पाने, बिया यांचा समावेश करण्यात येतो. तसेच या व्यतीरिक्त एका संशोधनात असे सिद्ध झाले आहे की एचआयव्ही, एड्‌स यासारख्या रोगांवर रोगसंहारक व प्रतिबंधक म्हणून उपयोगही केला जातो.

वरील बाबींशिवाय शेवग्याची फळं म्हणजेच बिया पिण्याचे पाणी शुद्ध करतात. बियांचा लगदा गढूळ पाण्याला निर्जंतुक करून स्वच्छ करतो. तसेच बियांचा उपयोग तेल काढण्यासाठी होतो. त्याला ‘ब्रेन ऑईल’ असे म्हणतात.

शेवग्याच्या शेंगांच्या काही पाककृती

शेवग्याच्या शेंगांची काठीयावाडी भाजी –

ही भाजी काठीयावाड लोकांमध्ये जास्त प्रमाणात बनते.

साहित्य :- शेवग्याच्या ४ शेंगाचे काप, २ ते ३ टोमॅटो, ५ ते ६ लसूण कळ्या, १ इंच आलं, २ ते ३ हिरव्या मिरच्या, २ कांदे, १ चमचा धने पावडर, १ चमचा तिखट १/२ चमचा हळद, १ चमचा गोडा मसाला, फोडणीकरिता तेल, मोहरी, जिरे आणि हिंग, चवीनुसार मीठ, साखर.

कृती :- सर्वप्रथम कांदा बारीक चिरून घ्यावा, २ टोमॅटोची प्युरी करून घ्यावी व १ टोमॅटो बारीक चिरून घ्यावा, लसूण + आलं+ हिरवी मिर्ची ठेचून घ्यावी. कढईत फोडणीकरिता तेल घालून त्यात मोहरी, जिरे, हिंग घालून बारीक चिरलेला कांदा घालावा व परतून घ्यावा नंतर त्यात लसूण मिर्ची पेस्ट घालावी व परतून घ्यावी व सर्व मसाले एक-एक करीत घालावे व खमंग भाजून घ्यावेत व त्यांत चिरेलेल टोमॅटो व टोमॅटो प्युरी घालून शेवग्याच्या शेंगा घालाव्यात व चवीपुरते मीठ घालून भाजी परतवून घ्यावी व गरज भासल्यास पाण्याचा हबका देवून मंद आचेवर शिजवून घ्यावी. कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करावी.

शेवग्याच्या शेंगांचा वर्‍हाडी रस्सा –

साहित्य :- शेवग्याच्या शेंगा ४ ते ५, कांदा १ मोठा, लसूण ८ ते १० कळ्या, आलं २ इंच, हिरव्या मीर्च्या ३ ते ४, टोमॅटो १ मोठा आकाराचा, तेल फोडणीकरिता, मीठ चवीनुसार.

वाटण्याच्या मसाल्याचे साहित्य :- खसखस १ टे. स्पून, मोठी विलायची १, छोटी विलायची २ नग, जायफळ पाव तुकडा, जायपत्री १ नग, लवंग ५ ते ६, मिरे ७ ते ८, लाल मिर्च्या ५ ते ६, सुके खोबरे १ स्टे. स्पून, २ टे. स्पू. धने पावडर, २ टे. स्पून गरम मसाला, २ टे. स्पून तिखट, १ टी. स्पून हळद, फुटाण्याच्या डाळ्या १ चमचा, कर्णफूल १/२ (अर्धे), तेजपान १-३.

कृती :- सर्वप्रथम शेवग्याच्या शेंगांचे काप करून घ्यावेत व स्वच्छ पाण्यात घालावे, कांदा चिरून थोड्या तेलावर परतवून घ्यावा व बारीक वाटून घ्यावा, लसूण मिर्ची अद्रक वाटून घ्यावे व टोमॅटो प्युरी तयार करून घ्यावी. वाटणाचा सर्व मसाला थोड्या तेलावर एक-एक करीत भाजून घ्यावा व त्याची पाणी घालून मिक्सरमध्ये मुलायम पेस्ट करून घ्यावी.

कढईत तेल घालून त्यात तेजपान घालावे व लगेचच त्यात वाटलेला कांदा व वाटलेले लसूण अद्रक घालून परतवून घ्यावे व नंतर त्यात मसाल्याचे वाटण घालावे (वाटण जास्त वाटत असल्यास थोडे बाजूला करावे)

वाटण चांगले परतून घ्यावे तेल सुटल्यावर त्यात हळद, तिखट, धनेपावडर, गरम मसाला घालून परतवून घ्या व पाण्याचा हबका मारून मंद आचेवर वाफ घ्या व नंतर जेवढा रस्सा हवा असेल तितके भाजीत गरम पाणी घाला व भाजी शिजवून घ्या. कोथिंबीर घालून सर्व्ह करा. गरमा गरम भाजी, भाकरी किंवा पोळीसोबत उत्तम लागते.

शेवग्याच्या शेंगांचं पिठलं –

साहित्य :- शेवग्याच्या शेंगा २ ते ३ साधारण काप करून, डाळीचे पीठ (बेसन), १/२ वाटी, ५ ते ६ हिरव्या मीर्च्या, कांदा -१, १ टोमॅटो बारीक चिरलेला, १ वाटी आंबट दही , हळद, तिखट, मीठ, चवीनुसार, तेल फोडणीकरिता.

कृती- थोड्या पाण्यात शेवग्याच्या शेंगा वाफवून घ्याव्यात. कढईत तेल फोडणी घालून त्यात मोहरी हिंग, बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या घालून परतवून घ्या. त्यात हळद, तिखट, टोमॅटो बारीक चिरून घाला व फोडणी खमंग करून घ्या.

पाण्यातून शेंगा बाहेर काढून फोडणीत घाला व परतवून घ्या. परतल्यावर उरलेले पाणी त्यात घाला. बेसन आणि दही चंागले एकत्र घोटून घ्या व सरसरित करा. पाण्याला उकळी आल्यावर त्यांत चवीनुसार मीठ घालून बेसन आणि दह्याचे मिश्रण घाला व वाफ घेऊन शिजू द्या. कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

फोडणीच्या वरणात देखील शेवग्याच्या शेंगा घालून वरण करतात तेही उत्तम आणि पौष्टिक असतं.

शेवग्याच्या पानांच्या काही पाककृती

शेवग्याच्या पानांची भाजी –

साहित्य :- शेवग्याची कोवळी पाने (साधारण १ जुडी होईल एवढा पाला) मुगाची डाळ १/२ वाटी, कांदा १, हिरव्या मिर्च्या ३ ते ४, लसूण पाकळ्या ५ ते ६, फोडणी साठी तेल, मोहरी, हिंग, कोथिंबीर.

कृती – मुगाची डाळ स्वच्छ धुऊन एक ते दीड तास भिजत घालावी व नंतर निथळून घ्यावी. शेवग्याची पाने निवडून स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर बारीक चिरावीत. १ कांदा हीरवी मिर्ची चिरून घ्यावे. एका कढईत तेल घालून त्यात मोहरी, हिंग हळद घालून फोडणी तयार करावी. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, बारीक केलेले लसूण घालून परतून घ्यावा. खमंग परतल्यावर त्यंात मुगाची डाळ, शेवग्याची पाने व मीठ घालून परतून घ्या व झाकण ठेवून वाफेवर भाजी शिजू द्यावी. गरज वाटल्यास पाणी घालावे व एक वाफ घ्यावी. गरमा गरम भाजी सर्व्ह करताना किसलेले ओले नारळ आणि कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करावी.

शेवग्याच्या पानांचे सूप –

हे सूप दक्षिण भारतात करतात. अतिशय रुचकर आणि लोहयुक्त असते.

साहित्य – शेवग्याची पाने २ वाट्या, शेवगा शेंगेतील दाणे १/२ वाटी, लिंबू , मीठ, साखर, काळीमीरी पावडर चवीनुसार.

कृती – शेवग्याची पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत व त्यात शेवग्याचे दाणे आणि सात वाट्यया पाणी घालून उकळून व गाळून घ्यावे. पाणी थोडे आटल्यावर चवीनुसार मीठ, साखर, लिंबू, काळेमीरे पावडर घालून सर्व्ह करावे.

शेवग्याच्या पानांच्या वड्या –

साहित्य :- शेवग्याचा पाला, बेसन, तांदूळ पीठ, रवा, हिरवी मिरची पेस्ट, ओवा, मीठ , हळद, तेल दही.

कृती :- शेवग्याचा पाला बेसन, तांदूळ पीठ, रवा ओवा, हळद तेल मीठ हिरव्या मिर्चीची पेस्ट घालून दही घालून भिजवून घ्यावे. तेलाचा हात लावलेल्या थाळीत थापावे व कुकरमध्ये वाफवून घ्यावे. थंड झाल्यावर वड्या कापाव्यात. कढईत तेल घालुन तळाव्यात किंवा फोडणी करून परतवाव्यात. ओले नारळ, कोथिंबीर सर्व्ह कराव्यात.

ttps://tarunbharat.org


h/