मासिक पाळी आणि जननचक्र

मासिक पाळी आणि जननचक्र – स्त्रियांचं पाळी चक्र आणि जननक्षमतेचं चक्र म्हणजेच नवा जीव निर्माण करण्याच्या क्षमतेचं चक्र एकामेकात गुंतलेलं असतं. पाळीची संपूर्ण प्रक्रिया चक्रांमध्ये घडते. पाळीचा पहिला दिवस ते पुढची पाळी सुरू होण्याच्या आधीचा दिवस म्हणजे एक पाळी चक्र. या पाळी चक्रातील सर्वात मोठी घटना म्हणजे स्त्री बीज पक्व होऊन बीजकोषाच्या बाहेर येऊन बीजनळ्यांमध्ये पोचणे. यालाच अंडोत्सर्जन किंवा इंग्रजीमध्ये ओव्ह्युलेशन म्हणतात. हे बीज बीजनलिकांमध्ये असताना जर त्याचा पुरुष बीजाशी संयोग झाला तर त्यातून फलित बीज तयार होतं आणि ते गर्भाशयाच्या भिंतीवर रुजतं. या फलित बीजाच्या पोषणासाठी गर्भाशयाचं अस्तर जाड होतं. मात्र स्त्री बीजाचा पुरुष बीजाशी संयोग झाला नाही, फलित बीज तयारच झालं नाही किंवा गर्भाशयाच्या भिंतीवर रुजलं नाही तर गर्भाशयाचं अस्तर ठराविक दिवसांनी गळून पडतं. यालाच आपण पाळी येणे असं म्हणतो.पाळीच्या पूर्ण चक्रामध्ये चार प्रकारची संप्रेरकं काम करत असतात. पिट्युटरी ग्रंथीतून पाझरणारी एल एच आणि एफ एस एच व बीजकोषांमध्ये तयार होणारी इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टरॉन ही चार संप्रेरकं पाळीचं आणि जननक्षमतेचं पूर्ण चक्रं नियंत्रित करतात.
मासिक पाळीची लांबी – माझी पाळी फार लवकर येते किंवा माझी पाळी फार उशीराने येते अशी वाक्यं आपण नेहमी ऐकत असतो. काही मुलींची पाळी 21-22 दिवसांनी येते तर काहींना दोन दोन महिने पाळी येत नाही. कधी कधी आजारपणात पाळी पुढे ढकलली जाते तर कधी प्रवासामुळे दगदग होऊन पाळी अपेक्षेपेक्षा लवकर येते. प्रत्येकीचं पाळीचं चक्र जसं वेगळं असतं तसंच दोन पाळी चक्रांमध्ये पण फरक पडू शकतो. यासाठी पाळीची लांबी कशी ठरते ते समजून घेऊ या.डॉक्टर सांगतात बरोबर 14व्या दिवशी अंडोत्सर्जन होतं आणि 28 व्या दिवशी पाळी येते. पण खरं तर हे पूर्ण सत्य नाही. प्रत्येकीच्या शरीराची आणि पाळीच्या चक्राची गती वेगळी असते.पाळीचक्रामध्ये अंडोत्सर्जन ही महत्वाची घटना असते. एकदा का बीज बीजकोषातून बाहेर आलं आणि गर्भधारणा झाली नाही तर त्यानंतर साधारणपणे 12-16 दिवसांनी पाळी सुरू होते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधीचा काळ मात्र निश्चित असतोच असं नाही. तो बदलू शकतो. प्रवास, मानसिक ताण, औषधोपचार अशा विविध कारणांमुळे हा काळ कमी किंवा जास्त होऊ शकतो. मात्र अंडोत्सर्जन झाल्यानंतर मात्र 16 दिवसात पाळी येते.त्यामुळे लवकर का उशीरा यापेक्षाही आपलं स्वतःचं पाळीचं चक्र कसं आहे ते समजून घेणं जास्त महत्त्वाचं.
संप्रेरके आणि लैंगिक भावना – स्त्रीच्या पाळीचक्राचा, त्यातील संप्रेरकांचा स्त्रीच्या लैंगिकतेशी थोडा फार संबंध आहे. अंडोत्सर्जन होण्याच्या काळात आणि आधी स्त्रीच्या बीजकोषांमध्ये इस्ट्रोजन हे संप्रेरक तयार होते. या संप्रेरकाचा प्रभाव असा की स्त्री बीज फलित व्हावं आणि गर्भ रहावा यासाठी शरीरात, भावनांमध्ये अनेक प्रकारचे बदल होतात. उदा. लैंगिक इच्छा तीव्र होणे, संभोग सुखकर व्हावा यासाठी योनिमार्ग आणि गर्भाशयात आवश्यक बदल होणे, इत्यादी. अंडोत्सर्जन होऊन गेल्यानंतर मात्र गर्भधारणा झाली असं गृहित धरून प्रोजेस्टरॉन या संप्रेरकाचा प्रभाव वाढीस लागतो. लैंगिक इच्छा कमी होते.अर्थात या शारीरिक प्रक्रिया झाल्या. प्रत्यक्षात लैंगिक संबंध सुखकर आणि संमतीने होत आहेत का, त्याविषयी स्त्री किंवा मुलगी कम्फर्टेबल आहे का यावर तिचा या संबंधांविषयीचा दृष्टीकोन तसंच भावना ठरत असतात.
पाळी चक्रात गर्भधारण कोणत्या काळात होऊ शकते? – गर्भधारणेसाठी स्त्री बीज बीजनलिकेत असणं आणि पुरुष बीज तिथपर्यंत जाऊन त्यांचा संयोग होणं आवश्यक असतं. पुढची पाळी येण्याच्या साधारण 12-16 दिवस आधी अंडोत्सर्जन होतं. बीजनलिकेत स्त्री बीज 12 ते 24 तास जिवंत राहतं. या काळात गर्भ धारणा होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. मात्र हा काळ नेमकेपणाने सांगता येईलच असं नाही. तसंच पुरुषबीजं स्त्रीच्या योनिमार्गात 3 ते 5 दिवस जिवंत राहू शकतात. म्हणून अंडोत्सर्जनाच्या आधी 4 दिवस आणि नंतर 2 दिवस हा काळ जननक्षम मानला जातो. या काळात गर्भधारणा होऊ शकते.
लैंगिकता जागरुकता आणि कुशल गर्भनिरोधन (सुरक्षित गर्भनिरोधकांच्या माहितीसाठी सेक्स बोलें तो सदर पहा) – आपल्या शरीरात, पाळी चक्रात कधी आणि काय घडतंय याची माहिती आपण घेतली, त्या घटनांचा मागोवा घेतला, नोंदी ठेवल्या तर काही काळाने अंडोत्सर्जन नक्की कधी, कोणत्या क्षणी झालं हेही आपल्याला समजू शकतं. गर्भधारणा कधी, कुठल्या काळात आणि कशी होते याची माहिती घेतली तर ती होण्यासाठी किंवा टाळण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो.सुरक्षित गर्भनिरोधकांचा वापर करून आणि संभोगाव्यतिरिक्त प्रणयाच्या इतरही पद्धती अवलंबून गर्भधारणा टाळता येऊ शकते. यातून पुरुषांनाही जननाच्या प्रक्रियेत जबाबदारपणे सामील होता येतं. मात्र त्यासाठी आपल्या शरीराचं, पाळी-जनन चक्राचं अचूक ज्ञान, दोघा जोडीदारांचा एकमेकांवरचा विश्वास आणि सहकार्य आवश्यक आहे.
copied from : http://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/